यशोदानगर मधे जास्त बिल आले म्हणून स्वताला जाळ्ले: संजय पाटिल

AM News | Breaking! वीज पुरवठा खंडित ...
Liladhar Gaydhane

संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया : 11 ऑगस्ट 2020 : नागपूर : लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्ष वीज मीटर रिडिंग न घेता अंदाजे काढण्यात आलेल्या वीज बिलांचा राज्यभरात अनेक नागरिकांना फटका बसला. ते बिल कमी करण्यासाठी अनेक नागरिकांना वीज महामंडळाच्या कार्यालयाच्या (एमएससीबी) खेटाही माराव्या लागल्या. मात्र, नागपूरमध्ये लॉकडाऊनमधील केवळ घरगुती वापराचं वीज बिल चक्क 40 हजार रुपये आलेल्या व्यक्तीने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

लीलाधर गायधने असं या व्यक्तीचं नाव आहे. वारंवार MSEB च्या कार्यालयात हेलपाटे मारुनही दिलासा न मिळाल्याने गायधने यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. लीलाधर गायधने हे एका खासगी ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. लॉकडाऊनमध्ये आर्थिक उत्पन्नाची साधनं बंद झाली. त्यातच घरगुती वापराचं वीज बिल थेट 40 हजार रुपये आल्याने गायधने यांना धक्का बसला. त्यांच्या घरात कोणत्याही सामान्य घरात असावे इतकेच बल्ब आणि फॅन आहेत. मात्र, त्याचं बिल थेट 40 हजार आल्याने लीलाधर गायधने बरेच दिवस तणावात होते.

गायधने यांनी हे वीज बिल कमी करण्यासाठी वीज महामंडळाच्या कार्यालयात अनेकदा हेलपाटेही मारले. मात्र, तेथे त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. उलट बिल न भरल्यास घरातील वीजही खंडीत होण्याची भीती त्यांच्या मनात तयार झाली. अखेर त्यांनी स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली, अशी माहिती गायधने यांच्या कुटुंबाने दिली. गायधने कुटुंबाने सांगितलं, “लॉकडाऊनमध्ये आम्हाला घराचं वीज बिल 40 हजार रुपये आलं. इतकं बिल भरणं आम्हाला शक्य नव्हतं. आर्थिक परिस्थिती नसल्याने आम्ही हे वीज बिल कमी करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही काळाने घरातील वीजही खंडीत होण्याची भिती निर्माण झाली. त्यातूनच त्यांनी स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली.” या घटनेची यशोधानगर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा मतदारसंघ असलेल्या उत्तर नागपुरातील लीलाधर गायधने यांनी महावितरणने पाठविलेल्या भरमसाठ बिलाचा धसका घेऊन आत्महत्या केल्याच्या आरोपाने एकच खळबळ उडाली. विद्युत मंडळावर आरोप होत असतानाच, गायधने यांनी गेले वर्षेभर वीजबिलच भरले नव्हते, अशी माहिती महावितरणने पुढे केली आहे.

महावितरणने जून महिन्यात वीजग्राहकांना सरासरी बिल पाठवल्याने वीजग्राहकांना मोठ्या रकमेची बिले आली. यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम व असंतोष होता. यावरून आंदोलने झाली. रविवारी गायधने यांनी आत्महत्या केली. विजेचे भरमसाठ बिल आल्याचा धक्का सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या आप्तजनांनी केला होता. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले. वीजकंपनीवर टीकेची झोड उठली. दरम्यान, महावितरणने मात्र आत्महत्या आणि वीजबिलाचा संबंध फेटाळून लावला. त्यांच्या मते, गायधने यांना जून महिन्यात प्रत्यक्ष मीटर रीडिंगनुसार फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून या पाच महिन्यांचे एकत्रित १ हजार ५१५ युनिट वापराचे १३ हजार २९४ रुपयांचे वीजबिल देण्यात आले. दरम्यान, गायधने यांच्याकडे जून २०१९ ते जानेवारी २०२० अशी आठ महिन्यांची मागील थकबाकी रुपये २३ हजार ७४६ होती. तसेच वीजबिलाची थकबाकी आणि मागील वर्षाची थकबाकी मिळून एकूण ३७ हजार ०४० रुपयांचे देयक देण्यात आले. यात जुलैच्या देयकानुसार ३०८ युनिट वीजवापरासाठी २,९६९ इतकी रक्कम आहे व मागील थकबाकी ३७,०४० रुपयांसह देयक ४० हजार ०१० रुपयांचे आहे. लॉकडाउनच्या काळातील वीजबिल मोठ्या रकमेचे असल्याने वीजग्राहकांना ते सुलभ हप्ते पाडून भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, गायधने यांनी त्याचा लाभ घेतला नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. गायधने यांनी वीजबिल कमी करण्यासाठी अनेकदा अर्ज केले. मात्र, अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही व बिल कमी करण्यास नकार दिला. त्यामुळे हताश होऊन गायधने यांनी अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. दोन अथवा तीन महिन्यांचे बिल भरले नाही तर, कंपनी वीज कनेक्शन कापते. गायधने यांच्याकडे जर वर्षभरापासून वीज बिल थकीत होते तर कनेक्शन का कापले नाही? असा आश्चर्यकारक सवाल आता उपस्थित केला जात आहे.

देवेंद्र फड़णवीसची प्रतिक्रिया

सामान्यांपासून ते थोरामोठांपर्यंत..! वीजबिलाच्या ‘शॉक’मधून कुणीही सुटले नाही. आंदोलने झाली, सर्वसामान्यांनी कोरोनाचा धोका पत्करून रांगा लावल्या. पण, त्यांना न्याय मिळाला नाही. लीलाधर गायधने यांनी जाळून स्वत:चे जीवन संपविले. सरकार आता तरी जागे होईल का? नागपुरात लॉकडाऊनमध्ये घरगुती विजेचे बिल चक्क 40 हजार रुपये आलेल्या व्यक्तीने जाळून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. सामान्य नागरिकांना या वाढीव वीजबिलांतून तात्काळ दिलासा द्यावा, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे “कोरोनाच्या काळात समाजातील अनेक घटक आर्थिक संकटात असताना एकाही घटकासाठी राज्य सरकारने आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. मदत करू शकत नसाल, तर किमान त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड तरी लादू नका. माझी पुन्हा एकदा विनंती आहे, सामान्य नागरिकांना या वाढीव वीजबिलांतून तात्काळ दिलासा द्यावा !” असे फडणवीस म्हणाले.

Leave a comment