
संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया : 20 जुलै 2020 : काही रेल्वे मार्गांचे खासगीकरण करण्याची योजना भारतीय रेल्वेने ऐरणीवर आली आहे. या योजनेत २०२३पर्यंत १५ हजार कोटी रुपयांची खासगी गुंतवणूक होईल, असा अंदाज आहे. सुरुवातीला मूळ स्थानक ते गंतव्य स्थानापर्यंतच्या १०९ जोड्या करून, एकूण १५१ गाड्यांचा ताफा खासगीकरणात आणण्याच्या योजनेचा आराखडा तयार होत आहे.
तिकिटांचे दर, तसेच विक्री इत्यादी खासगी ऑपरेटरांची जबाबदारी राहील. रेल्वेच्या रुळांचे जाळे, सिग्नल प्रणाली, वीज व इतर पायाभूत सुविधा यांच्या वापराकरिता शुल्क, तसेच नफ्याचा काही भाग सरकारला द्यावा लागेल. अशा नव्या गाड्यांची संख्या सध्या १५० इतकी अपेक्षित आहे. या गाड्या मुख्यत्वे आरामदायी, म्हणजे विलासी विभागातील (वातानुकूलित) असतील. सध्या साध्या लाकडी, लोखंडी बाके असणाऱ्या कोचच्या तुलनेत, एका वातानुकूलीत कोचची किंमत अंदाजे तीस ते चाळीस टक्के जास्त असते. अशा वातानुकूलीत गाड्या १५ ते १८ कोचच्या असल्या, तर त्यांची प्रत्येकी किंमत जवळ जवळ १०० कोटी एवढी असेल.
या गाड्या रेल्वेचे असलेले जाळे तर वापरतीलच, शिवाय एकूण सुरक्षिततेसाठी रेल्वे चालक व गार्ड (रक्षक) यांचीही उपलब्धता असेल. हा प्रयोग लहान असला, तरी पुढे-मागे तो इतर मार्गांकरिता मोठ्या प्रमाणावर राबविता येईल. जागतिक स्तरावर अशा प्रयोगांना मिश्र प्रतिसाद मिळाल्याचे राकेश मोहन यांच्या समितीने नमूद केले आहे आणि तरीही हा एक करून पाहावा असा स्तुत्य प्रयोग आहे, असेही प्रतिपादन त्यांनीच केले आहे. मार्गांची निवड करताना ज्यावर प्रवासी संख्या जास्त आहे व जास्त महसूल मिळेल, असे मार्ग निवडणे आवश्यक आहे, हे मात्र खरे.
यामुळे भारतीय रेल्वेला प्रामुख्याने रुळांचे जाळे, सिग्नल प्रणाली व इतर पायाभूत सुविधा इत्यादींची सुरक्षितता व कार्यक्षमतेच्या आधुनिकीकरणावर लक्ष केंद्रित करता येईल. सध्या रेल्वेच्या जलद शताब्दी गाड्या ताशी १०० किलोमीटरच्या गतीने धावतात. या नव्या गाड्यांची गती ताशी १६० किलोमीटर (म्हणजे ४० ते ५० टक्के जास्त वेगवान) असेल. हे खूप फायद्याचे ठरेल. याशिवाय, त्यांना बुलेट ट्रेनसारखे स्पेशल रुळ वा इतर खास सुविधांची गरज लागणार नाही; त्यामुळे अशा वेळेचे बंधन पाळणाऱ्या, वेगवान, सुरक्षित, आरामदायी गाड्या लोकांच्या पसंतीस उतरतील, यात शंका नाही.
तिकीट दरवाढ करावी न लागता, दर दिवशी अतिरिक्त किलोमीटर प्रवास केल्यामुळे एकूण उत्पन्नात, तसेच उत्पादकतेत निश्चित भर पडेल; हा दुहेरी फायदा आहे. या गाड्यांचे मार्ग ठरविताना, प्रवासी संख्येबरोबर, ताशी १६० किमीच्या मध्यम गतीवर चालू शकतील, असे मार्ग निवडणे आवश्यक ठरेल. गाड्यांचे मार्ग ठरविताना त्यांचा ताशी वेग, आराम, तसेच सुरुवातीच्या व शेवटच्या स्थानकांवर कमीत कमी वेळ हे महत्त्वाचे निकष असावेत. वेळ वाचविण्यासाठी सर्वसाधारणपणे विमान प्रवासाला प्राधान्य देणाऱ्या उच्च वर्गातील प्रवाशांना, मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी या गाड्या हा एक चांगला पर्याय ठरू शकेल. नाही तरी, विमानतळावर जाणारे तीन ते चार तास, जास्त वेळ आणि खर्च यांच्या तुलनेत ही नवी प्रणाली लोकांना पसंत पडावी.
अमेरिकेच्या आकारमानामुळे, दोन शहरांमधील अंतरे ही ब्रिटन व इतर युरोपियन देशांच्या तुलनेत खूप जास्त असतात, म्हणून तेथील लोक विमान प्रवासाला प्राधान्य देतात. ब्रिटन व इतर युरोपियन देशांत रेल्वे प्रवास हा जास्त पसंत केला जातो. आपल्याकडील परिस्थिती ही दोन्ही प्रकारात मोडत असल्यामुळे, या नव्या आरामदायी, जलद गाड्यांचा पर्याय लोकांना पसंत पडेल, असे वाटते.
रेल्वेने अशा प्रकारच्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित करणे फायद्याचे ठरेल. इंधनाची बचत, तसेच पर्यावरणाला कमीतकमी हानिकारक असा हा पर्याय विमानप्रवास अथवा खासगी गाड्या, बसेसने रस्त्यावरील प्रवासाच्या तुलनेत एक प्रवासी अथवा एक टन भार वाहण्यासाठी फक्त एक षष्ठांश इंधन वापरतो. म्हणजेच, बुलेट ट्रेनसारखी नव्या पायाभूत सुविधांमध्ये खूप मोठी गुंतवणूक करावी न लागता, या मध्यमगती पर्यायामुळे ४० ते ५० टक्के जास्त वेगवान प्रवास होईल. याद्वारे खासगीकरणाच्या पर्यायाशिवाय देखील, ७५ टक्के हाय व्हॉल्यूम मायलेजचे उद्दिष्ट रेल्वे साध्य करू शकेल.
तत्त्वत: खासगी रेल्वे गाड्यांचा पर्याय बऱ्याच मोठ्या प्रमाणावर ब्रिटनमध्ये हाताळला गेला; परंतु तो त्यांना फारसा उपयुक्त अथवा उजवा वाटला नाही. त्यांच्या अनुभवावरून धडा घेऊन, कुशल व कार्यक्षम आधुनिकीकरणाच्या जोरावर, आपल्या देशात हे मॉडेल सरकारी तसेच खासगी ऑपरेटर्सना किफायतशीर ठरू शकेल. रेल्वेच्या प्रचंड जाळ्याचा वापर करताना, सुरक्षिततेचा प्राथमिक निकष लावून, हे काम रेल्वेच्या अखत्यारीतच ठेवल्यास बरेच फायदे संभवतात. खासगीकरणासाठी हे अतिशय नमुनेदार क्षेत्र ठरावे. अर्थात, ही वाट बिकट असेल; पण त्यावर तोडगे काढत गेल्यास अंतिमत: खूप मोठ्या प्रमाणावर चांगले फायदे संभवतात.
रुळांच्या आधुनिकीकरणानंतर, प्रवासी गाड्यांना जास्त जागा मिळण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. हे घडण्याच्या दृष्टीने माल वाहतुकीसाठी दोन स्वतंत्र कॉरिडॉर्सची निर्मिती प्रथम व्हायला हवी. उदाहरणच द्यायचे झाले, तर उत्तरेकडून पश्चिम व पूर्व किनाऱ्यांकडे (लुधियाना ते मुंबई, तसेच पश्चिम उत्तर प्रदेशाकडून कोलकता) असे फ्रेट कॉरिडॉर्स ह रेल्वेचा सर्वांत महत्त्वाचा प्रकल्प आहे, जो राबविला गेला नाही. तो राबवणे आवश्यक आहे.
आता तर हा प्रकल्प अग्रक्रमाने कार्यान्वित व्हायला हवा आणि इतर क्षेत्रांसाठी त्याची व्याप्ती वाढवायला हवी. असे केल्यास, सध्याच्या टर्मिनसवर अतिरिक्त सुसज्ज, जलद प्रवासी गाड्या सुरक्षितपणे, तसेच किफायतशीर रीतीने चालविता येतील. खासगी ऑपरेशन्स करण्यासाठी तिकिटांचे दर हा अतिशय महत्त्वाचा (निर्णायक) मुद्दा असतो; पण भासतो तितका तो सोडवायला कठीण नसतो. या आधुनिक गाड्यांसाठी तिकिटाचे दर सामान्य गाड्यांपेक्षा जास्त; पण विमान प्रवासाच्या तुलनेत कमी असावेत. हा पर्याय निवडताना, रेल्वेच्या त्या मार्गावरील इतर गाड्यांच्या दरांऐवजी, विमानाच्या तिकिटाशी तुलना होणे गरजेचे आहे. सध्या रेल्वेच्या खास गाड्यांवरील तिकिटाचे दर हे एअरलाइन्सच्या लवचिक दरांपेक्षा फार कमी नसतात. नव्या आरामदायी गाड्यांची तिकिटे जुन्या गाड्यांच्या तिकिटांपेक्षा उघडच महाग असतील. आपण भारतीय दर, मूल्य यांबाबत सावध असतो; परंतु चांगली सेवा व वेगवान प्रवास यांत वेग हा निश्चित जास्त महत्त्वाचा असतो, हेही यात लक्षात घ्यायला हवे. तिकिटांचे दर असे असावेत, जेणेकरून गाड्या भरतील; पण गर्दी, गचडी होणार नाही. इथेच या नवीन सेवेच्या यशाचे मर्म असेल! ( अशोक दातार–लेखक वाहतूकतज्ज्ञ आहेत)
नागपूरला खासगी रेल्वे

देशातील १०९ मार्गांवर १५१ खासगी रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. यात नागपूर-मुंबई-नागपूर या मार्गावर दोन गाड्या धावणार आहेत. नागपूर प्रमाणेच मुंबई-अकोला दरम्यानही रेल्वेची खासगी सेवा असणार आहे.
देशात जवळपास १३ हजार प्रवासी रेल्वे गाड्या रेल्वेच्या विविध मार्गांवर धावतात. पण प्रवाशांची मागणी पाहता देशात २० हजार रेल्वे प्रवासी गाड्या नियमित धावण्याची आवश्यकता आहे. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वेने हा खासगी गाड्यांचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेचे जवळपास ६८ हजार किलोमीटर मार्गांचे जाळे आहे. २०१८- २०१९ मध्ये उपनगरी रेल्वेचे प्रवासी वगळता ३.६५ अब्ज लोकांनी आरक्षण करून रेल्वेने प्रवास केला. मात्र जवळपास ८.८५ कोटी प्रवासी प्रतीक्षा यादीमध्ये होते. या इच्छुक प्रवाशांना आरक्षण न मिळाल्यामुळे प्रवास करता आला नाही. अशा कोट्यवधी प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे गाड्या खासगी भागिदारीने चालविण्यात येणार आहे.
प्रवाशांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता यावा, अद्ययावत प्रवासी बोगी तयार करण्यात याव्यात आणि प्रवासाचा वेळ कमी व्हावा, यासाठी हा विचार करण्यात आला आहे. त्यासाठी पात्रता विनंती प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहेत. कोणत्या मार्गांवर खासगी गाड्या चालविल्या जाणार याबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर-मुंबई-नागपूर तसेच मुंबई-अकोला या दोन मार्गांवर खासगी रेल्वे गाड्या धावणार आहेत. या दोन्ही मार्गांवर प्रवाशांची नेहमी गर्दी असते. त्यामुळेच हा निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे नागपूर आणि अकोल्यातील प्रवाशांना मुंबईसाठी आता अतिरिक्त गाड्याही उपलब्ध होऊ शकतील. नागपूर-सेवाग्राम पर्यंत तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग टाकण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. तिसऱ्या मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. चौथाही मार्ग गती घेत आहे.
राहुल गांधी यांनी विरोध केला

नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारने रेल्वेच्या खासगीकरणाच्या दिशेने उचललेल्या पहिल्या पावलावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सरकारने असे केल्यास देशातील जनता सरकारला माफ करणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. रेल्वे मंत्रालयाने आज देशातील एकूण १०९ जोडी मार्गांवर खासगी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली आहे. देशभरात असलेले रेल्वेचे जाळे एकूण १२ क्लस्टरमध्ये विभागले गेले आहे. याच क्लस्टरमध्ये या १०९ जोडी मार्गावर खासगी रेल्वे चालवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.
जगातील सर्वात मोठे असलेले भारतातील रेल्वे नेटवर्कद्वारे सुमारे १३ हजार ट्रेन चालतात. भारतीय रेल्वे जवळजवळ १२ लाख लोकांना रोजगार देते. प्रवासी सेवेचा एक मोठा भाग सवलतींवर चालतो. यामुळे काही वर्षांपासून रेल्वेला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. हे नुकसान भरून काढणे रेल्वे मंत्रालयाला शक्यही झालेले नाही.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विंट करत केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये लिहितात, ‘रेल्वे ही गरिबांची एकमेव जीवनरेषा आहे आणि सरकार त्यांच्यापासून ती हिरावून घेत आहे. जे हिरावून घ्यायचे आहे ते घ्या, मात्र हे लक्षात ठेवा- देशाची जनता याचे ठोस उत्तर देईल.’
सार्वजनिक सेवा उद्योगपती मित्रांच्या घशात घालण्याचा डाव; काँग्रेसचा आरोप

मुंबई:केंद्र सरकारने रेल्वेच्या खासगीकरणाच्या हालचाली सुरू केल्या असून त्यावरून काँग्रेसने भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजप सरकारने त्यांच्या काळात एकही सार्वजनिक उपक्रम निर्माण केला नाही. आता मात्र खासगीकरणाच्या माध्यमातून हे सार्वजनिक उपक्रम उद्योगपती मित्रांच्या घशात घालण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सहा वर्षाच्या कार्यकाळात एकही नवा सार्वजनिक उपक्रम उभारला नाही. मात्र काँग्रेस सरकारच्या काळात उभारलेले व लाखो लोकांना रोजगार देणारे जनतेच्या मालकीचे सार्वजनिक उपक्रम मोदी आपल्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालत आहेत, अशी घणाघाती टीका बाळासाहेब थोरात यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
दरम्यान, काल रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी एक ट्विट करून देशातील एकूण १०९ जोडी मार्गांवर खासगी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी रेल्वेने प्रस्ताव मागवले आहेत, असं स्पष्ट केलं आहे. देशभरात असलेले रेल्वेचे जाळे एकूण १२ क्लस्टरमध्ये विभागले गेले आहे. याच क्लस्टरमध्ये या १०९ जोडी मार्गावर खासगी रेल्वे चालवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. ही खासगी रेल्वे कमीतकमी १६ डब्यांची ठेवण्यात येणार आहे. तसेच या गाड्यांचा वेग १६० प्रति किमी इतका ठेवण्यात येणार आहे. या वेगात आणखीही वाढ होण्याची शक्यता आहे. या ट्रेनचा रोलिंग स्टॉक खासगी कंपनीकडून करण्यात येणार आहे. तसेच खासगी कंपन्यांनाच या सर्व गाड्यांची देखभाल करावी लागणार आहे. तर या सर्व ट्रेनसाठी लागणारे गार्ड आणि मोटरमन मात्र रेल्वेचे असणार आहेत. या साठी खासगी क्षेत्राकडून ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. केंद्र सरकार हे पाऊल उचलून आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देणे आणि त्याद्वारे देखभालीचा येणारा मोठा खर्च कमी करणे हा उद्देश साध्य करत आहे, असा दावा केंद्र सरकारने केला आहे.
खासगी ट्रेनसेवेसाठी मागवले प्रस्ताव

नवी दिल्ली: केंद्र सरकारने रेल्वेच्या खासगीकरणाच्या दिशेने पाऊल टाकणे सुरू केले असून देशातील एकूण १०९ जोडी मार्गांवर खासगी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी रेल्वेने प्रस्ताव मागवले आहेत. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली आहे. देशभरात असलेले रेल्वेचे जाळे एकूण १२ क्लस्टरमध्ये विभागले गेले आहे. याच क्लस्टरमध्ये या १०९ जोडी मार्गावर खासगी रेल्वे चालवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.
ही खासगी रेल्वे कमीतकमी १६ डब्यांची ठेवण्यात येणार आहे. तसेच या गाड्यांचा वेग १६० प्रति किमी इतका ठेवण्यात येणार आहे. या वेगात आणखीही वाढ होण्याची शक्यता आहे. या ट्रेनचा रोलिंग स्टॉक खासगी कंपनीकडून करण्यात येणार आहे. तसेच खासगी कंपन्यांनाच या सर्व गाड्यांची देखभाल करावी लागणार आहे. तर या सर्व ट्रेनसाठी लागणारे गार्ड आणि मोटरमन मात्र रेल्वेचे असणार आहेत.
या साठी खासगी क्षेत्राकडून ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. केंद्र सरकार हे पाऊल उचलून आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देणे आणि त्याद्वारे देखभालीचा येणारा मोठा खर्च कमी करणे हा उद्देश साध्य करत आहे. या मुळे ट्रान्झिट टाइमदेखील कमी होणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. या व्यतिरिक्त यामुळे देशातील बेरोजगारांसाठी नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच या उपक्रमामुळे प्रवाशांना योग्य ती सुरक्षा पुरवून जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करणेही शक्य होणार आहे. प्रवासी गाड्या चालण्यासाठी खासगी गुंतवणुकीचा रेल्वेचा हा पहिलाच उपक्रम आहे.
सर्व गाड्या भारतीय बनावटीच्या
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेच्या या प्रस्तावाबाबत ट्विट करत सविस्तर माहिती दिली आहे. विशेष म्हणजे या सर्व गाड्या निर्मितीचे काम भारतातच होणार आहे. ज्या कंपन्यांना हे काम देण्यात येईल त्या कंपन्यांना वित्तपुरवठ्यापासून ते खरेदी कामकाज आणि देखभालही करावी लागणार आहे.
सवलतही मिळणार
सरकारकडून कंपनीला ३५ वर्षांपर्यंत सवलत देण्यात येणार असून त्याअंतर्गत खासगी कंपनीला रेल्वेला निश्चित रक्कम आणि विजेचे शुल्क द्यावे लागणार आहे. त्यानुसारच एकूण महसुलाची विभागणी करण्यात येणार आहे.